*शासकीय आश्रमशाळा बोर्डा येथे प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन*
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा येथे आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पना, सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन या गुणांना वाव मिळण्याच्या हेतूने दोन दिवसीय प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान करण्यात आले होते.
दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ला प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून मा. प्रकल्प अधिकारी श्री विकास राचेलवार तर उद्घाटक म्हणून मा. सुधाकर अडबाले, विधान परिषद सदस्य, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ, नागपूर हे उपस्थित होते.
ह्या प्रदर्शनीमध्ये प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक या तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्राथमिक गटात एकूण 24, माध्यमिक गटातून 27 आणि उच्च माध्यमिक गटातून 11 अशा एकूण 62 प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या.
दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी विज्ञान प्रदर्शनीचा बक्षीस वितरण तथा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. यात अध्यक्ष म्हणून राजीव बोंगिरवार , सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) चंद्रपूर तसेच सूधाकर गौरकार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) , गिरीश पोळ , सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( विकास) व संजय जगताप, लेखाधिकारी इ. मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदर्शनीचे परीक्षण श्री संतोष साठे सर, हिंग्लज भवानी हायस्कूल, चंद्रपूर तसेच श्री धनंजय जीराफे सर, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, चंद्रपूर यांनी केले
यात प्राथमिक गटातून अनुदानित आश्रमशाळा, सरडपार येथील ‘रेन हार्वेस्टिंग’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक तर अनुदानित आश्रमशाळा, टेकामांडवा येथील ‘कारखान्यातील कार्बनीय पदार्थांचे शुद्धीकरण’ ह्या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. माध्यमिक गटातून शासकीय आश्रम शाळा, पाटण येथील ‘शाश्वत शेती’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक तर अनुदानित आश्रम शाळा, किरमिरी या शाळेतील ‘अन्न कचरा व्यवस्थापन’ या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक अनुदानित आश्रमशाळा, गडचांदूर येथील ‘ऑटोमॅटिक CO2 मशीन आणि आदिवासी युव्ही वॉटर फिल्टर’ या प्रतिकृतीला तर अनुदानित आश्रमशाळा, सरडपार येथील ‘बायो सीएनजी प्लांट’ या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला.
सदर विज्ञान प्रदर्शनीला परिसरातील जिल्हा परिषद शाळा तसेच बोर्डा येथील ग्रामस्थांनी भेट दिली व विज्ञान प्रदर्शनीची प्रशंसा केली.
सदर विज्ञान प्रदर्शनीचे उत्कृष्ट आयोजन करण्यासाठी शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा येथील मुख्याध्यापक श्री रामदास खवशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. आमदार सुधाकर अडबाले साहेब तथा प्रकल्प अधिकारी माननीय विकास राचलवार साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले.



